ज्योती मंडलिक : नमस्कार वहिनीसाहेब! जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आम्ही आमच्या “कॅम्पस क्रॉनिकल”च्या दुसऱ्या आवृत्तीची मध्यवर्ती संकल्पना “स्त्रीत्व आणि त्याचे विविध पैलू” अशी ठेवली आहे. या संकल्पनेनुसार आपल्यासारख्या प्रेरणादायी आणि कुशल प्रशासक महिलेचे मार्गदर्शन आम्हाला मिळावे, या हेतूने आम्ही आपली मुलाखत घेऊ इच्छितो. एक मुलगी म्हणून आपलं बालपण कसं गेलं, याबद्दल आपण काही सांगू शकाल का? तसेच, कुटुंबामध्ये “मुलगी” म्हणून आपल्याला कधी दुजाभाव किंवा वेगळी वागणूक मिळाली, असे आपल्याला जाणवले का?
वहिनीसाहेब : आपण सुरुवातीलाच मला “कुशल प्रशासक” म्हटलं, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानते. आता मी खरोखरच कुशल प्रशासक आहे की नाही, हे मी स्वतः कसे सांगणार!
माझ्या बालपणाबद्दल सांगायचे तर, माहेरी आम्ही चार बहिणी आणि दोन भाऊ. माझा नंबर तिसरा; म्हणजे आम्ही तीन मोठ्या बहिणी आणि आमच्या पाठीवर भाऊ. माझे वडील क्लास वन (वर्ग १) अधिकारी होते. त्यांचे संपूर्ण बालपण एका चांगल्या, सुसंस्कृत वातावरणात (संस्थान/राजवाड्यासारख्या) गेले होते आणि ते स्वतः उच्चशिक्षित होते. त्यामुळे “मुलगी झाली म्हणजे मोठे ओझे झाले”, असा त्यांचा विचार अजिबात नव्हता.
आमच्या घरात चार मुली असल्यामुळे अनेक जण माझ्या वडिलांना हिणवायचे, चिडवायचे की, “तुझ्या घरात चार-चार मुली आहेत, पुढे तुझं कसा होणार?” यावर माझे वडील नेहमी हसून उत्तर द्यायचे की, “माझ्या मुलींची काळजी तुम्ही करू नका. माझ्या मुलींसाठी राजकुमार घोड्यावरून येतील आणि त्यांना घेऊन जातील, हे तुम्हाला कळणारसुद्धा नाही.” आणि खरोखरच तसेच झाले; माझ्या दोन्ही मोठ्या बहिणींच्या लग्नासाठी माझ्या वडिलांना कसलाही त्रास झाला नाही. आई आणि वडील दोघेही सुशिक्षित आणि प्रगल्भ विचारांचे असल्यामुळे त्यांनी लोकांच्या अशा टोमण्यांना कधीच महत्त्व दिले नाही.
अगदी मनमोकळेपणाने सांगायचं तर, मुलगी झाली म्हणून माझे आजोबा आणि आजी माझ्या बारशालाही (नामकरण विधीला) आले नव्हते. पण माझ्या आई-वडिलांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केले आणि मुलगी असूनही माझा आनंदाने स्वीकार केला.
आमच्या आई-वडिलांनी आमच्यावर उत्तम संस्कार केले आणि सर्व गोष्टी शिकवल्या. आपली मुलगी भविष्यात दुसऱ्याच्या घरी जाणार आहे, तिथे तिला कोणत्याही अडचणी येऊ नयेत, हा त्यामागचा हेतू होता. हे बालपणीचे संस्कार खूप महत्त्वाचे ठरतात, कारण आई-वडील जे संस्कार देतात, त्याच शिदोरीवर आपण आपले भविष्य घडवतो आणि तेच संस्कार आपण पुढे आपल्या मुलांना देतो. या सर्वांसाठी मी माझ्या वडिलांची खरोखरच खूप ऋणी आहे.
ज्योती मंडलिक : वहिनीसाहेब, आपण कन्या, पत्नी आणि आई या तिन्ही भूमिका अतिशय प्रभावीपणे पार पाडल्या आहेत. या भूमिका निभावताना आपण नेमकी कोणती तत्त्वे अंगीकारली होती?
वहिनीसाहेब : जेव्हा आपण एका मुलीच्या भूमिकेत असतो, तेव्हा आपल्यावर घराची फारशी जबाबदारी नसते. आई आणि मोठ्या बहिणी घरातील सगळ्या जबाबदाऱ्या उचलत असतात. माझे वडील क्लास वन (वर्ग १) अधिकारी होते आणि ते सुशिक्षित असल्याने मुला-मुलींच्या शिक्षणाला त्यांचे पहिले प्राधान्य होते. वडिलांच्या नोकरीमुळे दर दोन-तीन वर्षांनी त्यांच्या बदल्या होत असत, तरीही त्यांनी आमच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. कन्या म्हणून आई-वडिलांच्या ज्या काही अपेक्षा होत्या, त्या मी माझे शिक्षण उत्तम प्रकारे पूर्ण करून यशस्वीपणे पूर्ण केल्या.
लग्नानंतर पत्नीची भूमिका स्वीकारताना जबाबदाऱ्यांचे स्वरूप पूर्णपणे बदलते. माझ्या बाबतीत हा बदल खूप मोठा होता, कारण मी एका वरिष्ठ अधिकाऱ्याची मुलगी होते आणि एका शेतकरी कुटुंबाची सून झाले होते. खेड्यातील बोलीभाषा आणि तिथली राहणीमान समजून घेणे सुरुवातीला कठीण होते, पण या सर्व जबाबदाऱ्या आनंदाने स्वीकारणे म्हणजेच “पत्नी” असणे होय. मला सांगायला अभिमान वाटतो की, कदम घराण्यात आल्यानंतर मी खंबीरपणे उभी राहिले आणि कुटुंबातील बावीस लग्ने लावून त्यांचे संसार उभे केले. खरं सांगायचं तर, माहेर आणि सासरच्या परिस्थितीत जमीन-अस्मानाचा फरक होता. माहेरी माझ्या दिमतीला पाच नोकर असायचे. अगदी डोक्यावर छत्र धरण्यापासून ते शाळेचा डबा नेण्यापर्यंत सगळी कामं करण्यासाठी शिपाई असायचा. इतक्या सुख-सोयींत आणि आरामात माझे बालपण गेले.
मला आठवतंय, मी जेव्हा चौथीला होते, तेव्हा आमच्या शेजारी राहणाऱ्या एका ज्योतिषांनी भाकीत केलं होतं की, “ही मुलगी ज्या घरात जाईल, तिथे लक्ष्मी आणि सरस्वतीचा वास असेल.” हे सगळं खरंच कौतुकास्पद होतं. एका बाजूला माहेरची “राजेशाही” आणि दुसरीकडे साहेबांच्या संघर्षाचा काळ, पण मी त्या परिस्थितीशी स्वतःला पूर्णपणे जुळवून घेतलं.
आई म्हणून माझ्यावर झालेले संस्कार हे माझ्या आईच्या आणि मोठ्या बहिणीच्या वागण्यातून आले होते. माझे लग्न खूप लवकर म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच झाले होते, त्यामुळे जबाबदारी म्हणजे काय हे तेव्हा फारसे कळत नव्हते. पण आई झाल्यावर मी एक तत्त्व अंगीकारले, ते म्हणजे मुलांच्या संगोपनाला पहिले प्राधान्य देणे.
मला सांगायला आनंद होतो की, माझी मुले मोठी होईपर्यंत मी सामाजिक किंवा संस्थात्मक कामात फारसा वेळ दिला नाही. साहेबांसोबत केवळ उद्घाटन किंवा काही महत्त्वाच्या कार्यक्रमांनाच मी उपस्थित राहायचे, पण मुलांना सोडून मी फार कुठे जात नसे. लग्नानंतर पाच वर्षांनी मी पहिल्यांदा महाबळेश्वर पाहिले. आजकाल लोक लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी फिरायला जातात, पण मी माझ्या वैयक्तिक सुखाला मुरड घातली. कारण साहेब तेव्हा “भारती विद्यापीठा”ची उभारणी करत होते. संसाराची आणि संस्थेची ती सुरुवातीची धडपड होती.
संस्था उभी करायची असेल, तर घरातील एका व्यक्तीने खंबीरपणे घर सांभाळणे गरजेचे असते. मुलांचे आजारपण असो किंवा ऑपरेशन्स, मी कधीही साहेबांना कामात व्यत्यय आणला नाही. मी त्यांना नेहमी सांगायचे, तुम्ही तुमचे काम करा, मी माझे काम आणि घर सांभाळेन. अगदी आणीबाणीच्या प्रसंगीच मी त्यांची मदत घ्यायचे. हेच कर्तव्य मी कन्या, पत्नी आणि आई म्हणून पार पाडले. यामुळेच मी माझ्या संसारात आनंदी राहू शकले आणि मुलांवर चांगले संस्कार करू शकले. आज माझी मुले त्यांच्या क्षेत्रात योग्य पदावर आणि योग्य दिशेने काम करत आहेत, याचे मला समाधान आहे.
ज्योती मंडलिक : वहिनीसाहेब, स्त्री-मुक्ती आणि स्त्री-स्वातंत्र्य याबाबत नवीन पिढीतील मुलींचा काहीसा वेगळा समज झालेला दिसतो. “मनाला येईल तसे स्वैर वागणे” म्हणजेच स्त्री-मुक्ती, असे त्यांना वाटते का? याबद्दल आपले नेमके मत काय आहे?
वहिनीसाहेब : या विषयावरची माझी मते कदाचित आजच्या पिढीतील सर्वांनाच पटतील असे नाही. कारण आमचा काळ वेगळा होता आणि आमच्या दृष्टीने स्त्री-मुक्ती व स्त्री-स्वातंत्र्याचे अर्थही खूप वेगळे होते. आम्हाला जे मिळाले होते, त्यातच आम्हाला समाधान वाटायचे आणि त्या सुखाची आम्हाला सवय होती. “मला अमूक मिळाले नाही”, “नवऱ्याने किंवा सासू-सासऱ्यांनी मला काही दिले नाही”, “लोक माझ्याबद्दल काय बोलले” किंवा “कोणी माझ्याकडे लक्ष दिले नाही”, असे विचार आमच्या डोक्यात कधी आलेच नाहीत. आम्ही या गोष्टींना कधी महत्त्वच दिले नाही. आम्हाला त्या काळातही आम्ही “मुक्त” आहोत असेच वाटायचे.
माझ्या मते, स्त्री-मुक्ती म्हणजे तोकडे कपडे घालणे किंवा आपला हसता-खेळता संसार उधळून लावणे नव्हे. हल्ली अनेकांना असे वाटते की, आपल्याकडे स्वतःचे पैसे नसतील तर आपला संसार उघड्यावर पडेल. पण हा विचार पूर्णपणे बरोबर नाही. शेवटी संसाराची जबाबदारी कोणीतरी एक जण उचलत असतो आणि ती पार पाडत असतो, मग ते सासू-सासरे असोत वा नवरा. त्यांच्याकडे पैसे मागणे म्हणजे “भीक मागणे” नव्हे; तर तो आपला हक्क असतो. उदाहरणच द्यायचे झाले तर, साहेब मला दर महिन्याला घरखर्चासाठी पैसे द्यायचे. याचा अर्थ असा नाही की मी त्यांच्याकडे भीक मागत होते. संसार सुरळीत चालवण्यासाठी ती एक गरज असते आणि असा विचार करणे अजिबात चुकीचे नाही.
ज्योती मंडलिक : वहिनीसाहेब, आजकालच्या मुलींचे स्त्री-स्वातंत्र्याबाबतचे विचार अपरिपक्व आहेत. “आम्हाला पाहिजे तसं वागता येणं म्हणजे स्त्री-मुक्ती” असा त्यांचा समज झालेला दिसतो. विशेषतः सोशल मीडियाचा खूप जास्त वापर होतो, युवा पिढीवर याचा नेमका काय प्रभाव पडतोय आणि त्यांच्यावर कोणते संस्कार होत आहेत?
वहिनीसाहेब : खरं सांगायचं तर, आमच्या वेळेस लग्नापर्यंत आम्हाला अनेक गोष्टींची माहिती नसायची; पण आजकालच्या मुलांना वयाच्या १४-१६ व्या वर्षापासूनच सगळ्या गोष्टींची माहिती असते. त्यामुळे आजची मुलं अपरिपक्व आहेत असं अजिबात म्हणता येणार नाही; ती विचारांनी परिपक्वच आहेत. याच परिपक्वतेतून मुला-मुलींनी स्वतः हे समजून घेतलं पाहिजे की, आपल्या वागणुकीचा आपल्या आजूबाजूच्या समाजावर, आई-वडिलांवर आणि घरच्या नातेसंबंधांवर काय परिणाम होईल. टोकाची भूमिका घेऊन संपूर्ण समाजाला आणि आपल्या आई-वडिलांना दुःखी करणं मला योग्य वाटत नाही.
या बाबतीत आई-वडिलांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. मुला-मुलींच्या अपरिपक्व विचारांना दिशा देण्याचं आणि ते कुठे चुकताहेत हे त्यांना समजावून सांगण्याचं काम आई-वडिलांनी केलं पाहिजे. हल्ली काय झालंय, मुलांना खूप स्वातंत्र्य मिळाल्यामुळे त्यांना काहीही समजावायला गेलो, तरी ते त्याचा चुकीचा अर्थ काढतात आणि लगेच टोकाचं पाऊल उचलतात. पण त्यांना योग्य पद्धतीने हाताळणं आणि त्यांच्या चुका त्यांच्या लक्षात आणून देणं हे आपलं कर्तव्य आहे.
माझं स्पष्ट मत आहे की, सध्याची सोशल मीडियासारखी जी माध्यमं आहेत, त्यांचा अतिवापर आणि चुकीचा प्रभाव खूप घातक ठरतोय. आपण एखादी गोष्ट किंवा बातमी सोशल मीडियावर टाकली की ती एका मिनिटात जगभरात पोहोचते. पाहणारा माणूस आपल्या सोयीनुसार तिचा सरळ किंवा चुकीचा अर्थ काढतो. यातून संपूर्ण समाजावर चुकीचा प्रभाव पडतो आणि समाजाचं संतुलन बिघडतं. एखाद्याने चुकीची गोष्ट केली तरी त्याचं समर्थन केलं जातं आणि त्यातून चुकीचा पायंडा पडतो.
सोशल मीडियावरील “स्टेटस”बद्दल बोलायचं झालं, तर लोक खाजगी आयुष्याचंही नको तितकं प्रदर्शन करू लागले आहेत. परंतु आपले व्यक्तिगत आयुष्य सोशल मीडियावर सर्वांसाठी स्टेटसला ठेवण्याचा विषय नाही. आपण नक्की काय करतोय, आपली प्रायव्हसी किती उघडी करायची याचं भान लोकांना राहिलेलं नाही. यातूनच अंधानुकरण सुरू होतं. आजकाल शालीनता लुप्तच झाली आहे, असं म्हटलं तरी हरकत नाही. त्याला बऱ्याच अंशी आई-वडीलही जबाबदार असतात. मुलं छोटे कपडे घालत असतील आणि कोणी त्याबद्दल विचारलं, तर “आमची मुलं काहीही घालतील, तो आमचा आणि त्यांचा प्रश्न आहे, आम्हाला माहितीये ती काय घालते” असं आई-वडीलच समर्थन करतात. त्यामुळे मुलांनाही मोकळीक मिळते.
कसे कपडे घालायचे त्याला विरोध नाहीच; पण ते कुठल्या ठिकाणी घालावेत, याचं एक “भान” असणं गरजेचं आहे. साधे कपडे कुठे घालावे आणि आधुनिक किंवा तोकडे कपडे कुठे घालावे हे ठिकाणानुसार ठरलं पाहिजे. हे सामाजिक भान आपण ठेवलं, तरच आपण आपले सामाजिक संस्कार आणि संस्कृती टिकवून ठेवू शकू, असं मला वाटतं.
ज्योती मंडलिक : वहिनीसाहेब, तुम्ही नवीन पिढीच्या मुलींना संसाराबाबत काय सल्ला द्याल?
वहिनीसाहेब : संसारात परिस्थितीशी एकरूप होण्याशिवाय काहीही इलाज नसतो. जर तुम्हाला संसाराची जबाबदारी घ्यायची नसेल, तर मग लग्नासारख्या गोष्टींना अर्थ उरत नाही. आजकालच्या मुलींनी हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या पिढीची भूमिका अशी आहे की, “जर नवऱ्याने माझ्यासाठी काही केलं तरच तो माझा, अन्यथा नाही.” आज लग्न होतंय आणि दुसऱ्याच दिवशी विभक्त होण्याचे विचार सुरू होतात. कधीकधी तर अवघ्या दोन वर्षांतच घटस्फोटाच्या बातम्या येतात.
मला असं वाटतं की, संसारात दोन पावलं पतीने टाकावीत आणि दोन पावलं पत्नीने टाकावीत. असा सुवर्णमध्य गाठून कुठेतरी तडजोड करणं गरजेचं असतं. पण आजच्या मुलींमध्ये ती तयारी अजिबात दिसत नाही.
सध्याच्या मुलींचा एक समज आहे की, नोकरी केलीच पाहिजे, अन्यथा स्वतःला “हाऊसवाईफ” म्हणून घेण्यात त्यांना कमीपणा वाटतो. पण मला वाटतं, “हाऊसवाईफ” असणे हे काही छोटे काम नाही, ते एक “फुल-टाईम प्रोफेशन” आहे. तिथे पगार मिळत नसला तरी मुलांचे भविष्य घडवल्याचे जे समाधान मिळते, तोच सर्वात मोठा पगार असतो.
ज्योती मंडलिक : वहिनीसाहेब, आदरणीय साहेबांनी “गतिमान शिक्षणातून समाज परिवर्तन” या ध्येयाने भारती विद्यापीठाची स्थापना केली आणि तळागाळातील लोकांसाठी शिक्षणाची दारे उघडली. साहेब लाखो लोकांसाठी आधारवड होते, पण आम्हाला असं वाटतं की आपण साहेबांचे “आधारवड” होतात. साहेबांच्या या अतुलनीय प्रवासात आपला सिंहाचा वाटा आहे. या प्रवासाबद्दल आपण काय सांगाल?
वहिनीसाहेब : आमच्या प्रवासाची सुरुवात सांगायची तर, १९७५ साली आमचे लग्न झाले. लग्नापूर्वी शंकरराव मोरे विद्यालय आणि भारती विद्यापीठाच्या काही परीक्षा सुरू होत्या, पण खऱ्या अर्थाने विद्यापीठाचा विस्तार आमच्या लग्नानंतरच झाला. १९७७ नंतर एकापाठोपाठ एक संस्था उभ्या राहिल्या. तो काळ आजच्यासारखा नव्हता; मोबाईल किंवा संवादाची जलद साधने उपलब्ध नव्हती. अशा काळात एक माणूस ध्ये्याने झपाटून एकटा धावत होता. अशा माणसासोबत संसार करताना त्यांना समजून घेणे आणि त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहणे, हे मी माझे कर्तव्य मानले.
मी स्वतःला “आधारवड” म्हणण्यापेक्षा “कर्तव्यदक्ष पत्नी” म्हणणे जास्त पसंत करेन. साहेबांच्या प्रवासात मी कधीही अडथळा बनले नाही किंवा त्यांच्याकडून अवाजवी अपेक्षा केल्या नाहीत. लग्नाच्या सुरुवातीच्या काळात एक सामान्य स्त्री म्हणून मलाही वाटायचे की, नवऱ्याने आपल्यासोबत असावे, मुलांच्या आजारपणात सोबत राहावे. पण साहेब २४ तास कामात आणि प्रवासात असायचे. एकदा मी याबद्दल यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नींकडे (वेणूताई चव्हाण) तक्रार केली.
मी त्यांना म्हटले, “वहिनीसाहेब, साहेबांच्या डोक्यात विद्यापीठाशिवाय दुसरं काहीही नसतं, ते सारखे बाहेर असतात.” त्यावर त्यांनी मला एक खूप सुंदर उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “विजूताई, तुमचा नवरा सकाळी १० ला कामावर जाईल आणि ५ ला घरी येऊन तुमच्या हाताचे पोहे खाईल, ही अपेक्षा सोडून द्या. तुमचा नवरा असा आहे जो घरात आला तर तुमचा आणि घराबाहेर पडला तर समाजाचा! हे ज्या दिवशी तुम्ही मनापासून स्वीकाराल, त्या दिवशी तुम्ही खऱ्या अर्थाने सुखी व्हाल.”
वेणूताईंचे ते वाक्य मी आजही जपून ठेवले आहे आणि त्याच विचाराने मी माझा संसार केला. त्यानंतर मला कधीही दुःख झाले नाही. माझ्या आयुष्यात असे अनेक प्रसंग आले, मुलांचे मोठे ऑपरेशन असो किंवा माझे स्वतःचे मोठे ऑपरेशन, साहेब मला सकाळी ७ वाजता ऑपरेशन थिएटरमध्ये सोडून त्यांच्या कामाला निघून जायचे. डॉक्टरांनाही आश्चर्य वाटायचे की साहेबांचा साध्या चौकशीसाठी फोनही कसा येत नाही? पण मी साहेबांना कधीही “माझ्यासाठी थांबा” किंवा “मुलांसाठी थांबा” असे म्हणून अडवले नाही.
आमचे जगणे अतिशय सर्वसामान्य होते. लग्नानंतर आम्ही साडेचारशे स्क्वेअर फुटांच्या वन बेडरूम घरामध्ये राहत होतो. आजच्या पिढीला वाटेल की आमचा मोठा बंगला असेल, पण ५० वर्षांपूर्वी त्या लहानशा घरात साहेबांना भेटायला येणाऱ्या लोकांचा राबता असायचा. साहेबांचा संसार हा जगाचा संसार झाला होता आणि त्यात जुळवून घेण्याचे संस्कार माझ्यावर झाले होते. भारती विद्यापीठ आज ज्या उंचीवर उभे आहे, त्यात माझा वाटा मी शब्दांत सांगणार नाही, पण साहेबांच्या श्वासात असलेल्या या संस्थेसाठी मी दिलेली साथ ही नकळत घडलेली एक महत्त्वाची गोष्ट होती. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की भारती विद्यापीठ म्हणजे श्वास साहेबांचा.
ज्योती मंडलिक : वहिनीसाहेब, आदरणीय साहेब सतत भारती विद्यापीठाचा विचार, समाजकारण आणि राजकारण यामध्ये २४ तास व्यस्त असायचे. अशा वेळी तुम्हाला वैयक्तिक आयुष्यात कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागले?
वहिनीसाहेब : वैयक्तिक पातळीवर मला खूप मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला. मुलांची ऑपरेशन्स, दवाखाने आणि माझे स्वतःचे आजारपण या गोष्टी तर होत्याच; पण माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धक्का म्हणजे माझ्या मोठ्या मुलाचे (दादाचे) अकाली निधन. तो आघात इतका मोठा होता की त्या दुःखातून सावरणे आजही कठीण वाटते.
पण एक सांगायला हरकत नाही, मुलाच्या निधनानंतर मी स्वतःला सावरले आणि अवघ्या १५-२० दिवसांत साहेबांनाही घराबाहेर काढले. मी त्यांना सांगितले, “तुम्ही घरात बसून राहू नका, कारण घरात बसलात तर तेच विचार पुन्हा पुन्हा सतावत राहतील.” कोणत्याही आई-वडिलांसाठी तरुण मुलाला गमावणे हे न पचणारे दुःख असते. मला तर त्या काळात वेड लागल्यासारखे झाले होते. एकदा साहेब मला मनपरिवर्तनासाठी गोव्याला घेऊन गेले, पण तिथे गर्दीतही मला माझा मुलगाच दिसायचा. घरात बसले तरी त्याचाच भास व्हायचा. पण साहेबांनी, माझ्या मुलांनी आणि जनतेच्या प्रेमाने मला या दुःखातून बाहेर काढले. साहेब नेहमी म्हणायचे, “आता आपल्याला ‘दादा’ला भारती विद्यापीठाच्या प्रत्येक मुलामध्ये शोधायचे आहे.”
साहेबांना पहिल्यापासूनच समाजकारण आणि राजकारणाची आवड होती. शिक्षणाचे कार्य करताना त्यांना अनंत अडचणी आल्या. फी माफीसाठी दोन-दोन दिवस रांगेत उभे राहणारे विद्यार्थी असोत किंवा एका सहीसाठी तहसीलदारांकडे ताटकळणारे लोक असोत; साहेबांनी प्रत्येकाला मदत केली. साहेबांचे एक तत्त्व होते, पुण्य कशात असते? तर केवळ २४ तास देवाच्या दारात बसून किंवा देव्हाऱ्यात घंटा वाजवून पुण्य मिळत नाही, तर प्रत्यक्ष गरजूंच्या मदतीला धावून जाण्यातच खरे पुण्य असते. त्यांनी तोच मार्ग निवडला आणि लोकांसाठी दवाखाने, वसतिगृहे, नोकऱ्या आणि शिक्षणाची सोय केली.
ज्योती मंडलिक : सध्याच्या शालेय शिक्षणाबद्दल आपले काय मत आहे?
वहिनीसाहेब : आजच्या पालकांचा कल इंग्लिश मिडीयमकडे जास्त आहे. आम्ही जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या शाळेत शिकलो, पण आम्हाला कधीही न्यूनगंड जाणवला नाही. आमच्या काळात शिक्षकांचा (गुरुजींचा) दाराडा/दबाव होता. त्यांनी दिलेला मार आणि लावलेली शिस्त यामुळेच आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत. आज मात्र परिस्थिती बदलली आहे; मुलाला थोडे बोलले तरी पालक भांडायला येतात किंवा मुले टोकाचे पाऊल उचलतात. शिक्षणात थोडी शिस्त आणि “आरेला कारे” म्हणण्याची समज असणे गरजेचे आहे, तरच मुलांना आपली चूक कळेल.
आज शिक्षणात विषयांचा इतका भडीमार झाला आहे की पालकांची आणि मुलांची तारांबळ उडते. पालकांना वाटते की आपल्या मुलाला सर्वच आले पाहिजे, पण हे शक्य नाही. आम्ही शालेय समितीच्या माध्यमातून मुलांचा कल (Interest) कशात आहे हे पाहून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहित करतो. जबरदस्ती करण्यापेक्षा आवडीनुसार शिक्षण देणे हेच प्रगतीचे लक्षण आहे.
ज्योती मंडलिक : वहिनीसाहेब, शिक्षण आणि समाजकार्यात तुमचे योगदान मोलाचे आहे. तुमच्या या कार्याची दखल घेऊन तुम्हाला “प्रेमलता चव्हाण” आणि “रमाई रत्न” यांसारख्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. एक आई म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण दिले. ताईसाहेबांच्या बोलण्यातून अनेकदा जाणवते की, तुम्ही त्यांना काटकसरीची आणि अभ्यासाची कशी शिस्त लावली होती. भारती विद्यापीठात एक कुशल प्रशासक म्हणून तुमची शिस्त, संवेदनशीलता आणि “आभाळमाया” प्रत्येक कर्मचाऱ्याने अनुभवली आहे. तुमचे हे व्यक्तिमत्त्व घडवण्यामागे कोणाचे संस्कार किंवा कोणाचा प्रभाव सर्वात जास्त आहे, असे तुम्हाला वाटते?
वहिनीसाहेब : माझ्या जडणघडणीत माझ्या आईचा उल्लेख करणे मला अत्यंत आवश्यक वाटते. आम्ही सहा भावंडे होतो आणि आमच्या आई-वडिलांनी आम्हा सर्वांवर शिस्त आणि संस्कारांचे खूप चांगले संस्कार केले होते. संसारात काटकसर कशी करावी, हे मी आईकडूनच शिकले. अगदी कपड्याचा एखादा तुकडाही वाया न घालवता त्याचा पुनर्वापर कसा करावा, हे तिने आम्हाला शिकवले. ताईंनी सांगितलेली पिशव्यांची गोष्ट अगदी खरी आहे; आजही माझ्याकडे पडद्यांच्या कपड्यांपासून शिवलेल्या १०० हून अधिक पिशव्या मिळतील. जुन्या वस्तू टाकून न देता त्यातून नवीन आणि उपयुक्त काहीतरी कसे घडवावे, ही शिकवण मला आईकडूनच मिळाली आणि आजही मी ती जपली आहे. मुलांना शिस्त लावणे म्हणजे त्यांना मारणे असा माझा दृष्टीकोन कधीच नव्हता. मी किंवा साहेबांनी मुलांना कधीच मारले नाही; ते केवळ आमच्या डोळ्यांच्या धाकात असायचे. समाजात प्रगती करायची असेल, तर शिस्तीशिवाय पर्याय नाही, असे माझे ठाम मत आहे. माझी तिन्ही मुले भारती विद्यापीठातच शिकली, पण त्यांच्याकडे कोणी बोट दाखवेल, असे वागण्याची हिम्मत कोणाचीही नव्हती.
एक प्रसंग मला आठवतो, विश्वजीत (माझा मुलगा) लहान असताना त्याने एकदा गृहपाठ केला नव्हता. मी त्याच शाळेची चेअरमन होते आणि योगायोगाने मी शाळेच्या “सरप्राईज व्हिजिट”ला गेले होते. शिक्षिकेने त्याला शिक्षा म्हणून वर्गाबाहेर कान/अंगठे धरून उभे केले होते. मी ते पाहिले, पण काहीही न बोलता माझा राऊंड पूर्ण करून ऑफिसमध्ये निघून गेले. थोड्या वेळाने एका वॉचमनने त्या शिक्षिकेला घाबरवले की, “तुम्ही साहेबांच्या मुलाला बाहेर उभे केले, आता तुमची नोकरी धोक्यात येईल.” त्या शिक्षिकेने घाबरून मला फोन केला आणि माफी मागितली. मी त्यांना शांत केले आणि सांगितले की, “तुमची काहीही चूक नाही, तुम्ही तुमचे काम चोख बजावले आहे.” उलट, मी त्या वॉचमनला दम भरला की, “माझा मुलगा चुकला म्हणून त्याला शिक्षा झाली, तू तुझे काम बघ.” या घटनेचा मुलावर सकारात्मक परिणाम झाला आणि त्यातूनच त्याचे व्यक्तिमत्त्व घडत गेले.
आमच्या मुलींच्या बाबतीतही हाच साधेपणा होता. त्या काळात मुली सकाळी ९ ला घरचा डबा घेऊन कॉलेजला जायच्या आणि ५ ला परत यायच्या. हॉटेलींग, कॅन्टीन किंवा विनाकारण फिरणे त्यांना माहिती नव्हते. त्यांनी कधीही कॉलेज बुडवले नाही. आमचे संस्कार जपतच त्या मोठ्या झाल्या.
ज्योती मंडलिक : आपल्या प्रभावी मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठाच्या ९० शाळा कार्यरत आहेत, नियमांचे कडक पालन होत असतानाच तिथे प्रत्येक विद्यार्थ्याला / विद्यार्थिनीला उच्च दर्जाचे शिक्षण मिळते आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व उभारून येते, या शाळांच्या कार्यपद्धतीबद्दल आपण काही सांगू शकाल का?
वहिनीसाहेब : सध्या मी शालेय समितीची अध्यक्ष म्हणून काम पाहत आहे. भारती विद्यापीठाने महिलांसाठी शिक्षणाची सर्व दालने उघडली आहेत. आज खेड्यापाड्यातील एकही मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून साहेबांनी हजारो आदिवासी मुलींना दत्तक घेतले; त्यांच्यासाठी मोफत वसतिगृहे आणि फी माफीच्या सवलती दिल्या. भारती विद्यापीठाच्या ग्रामीण शाळांमध्ये देखील शहरातील शाळांप्रमाणे उच्च दर्जाच्या सोयी आहेत, याचा मला अभिमान वाटतो.
ज्योती मंडलिक : सावित्रीबाईंनी लावलेल्या ज्ञानाच्या रोपट्याला वाढवणाऱ्या आणि सबलीकरणाचा वारसा चालवणाऱ्या प्रत्येक स्त्रीला ‘सावित्रीची लेक’ असे म्हटले जाते. भारती विद्यापीठाच्या शाळांची व्याप्ती एवढी वाढली आहे आणि तिथे जोपासलेला ज्ञानाचा वृक्ष प्रचंड पसरला आहे. या शाळांमधून उच्च शिक्षण घेऊन स्त्री शक्तीचा जागर करणाऱ्या विजयमालाजींच्या लेकींकडून आपल्या काय अपेक्षा आहेत?
वहिनीसाहेब : सावित्रीबाई फुलेंनी लावलेल्या ज्ञानाच्या रोपट्याचा आज विशाल वृक्ष झाला आहे. भारती विद्यापीठातून शिक्षण घेणाऱ्या प्रत्येक मुलीला मी आधी “सावित्रीची लेक” आणि नंतर “भारती विद्यापीठाची लेक” मानते. या सर्व मुलींकडून माझी एकच अपेक्षा आहे, तुम्ही जे शिक्षण आणि संस्कार इथे घेतले आहेत, त्या आधारावर तुमच्या आयुष्याची वाटचाल करा. कुटुंबाला किंवा वैयक्तिक प्रतिमेला बाधा येईल, असे कोणतेही चुकीचे कृत्य तुमच्याकडून घडू नये. तुम्ही यशाची उंच भरारी नक्कीच घ्यावी, पण साहेब नेहमी म्हणायचे त्याप्रमाणे, “तुमचे पाय नेहमी जमिनीवर असले पाहिजेत.” जेव्हा पाय जमिनीवर असतात, तेव्हाच आपण आपली सर्व धध्येये साध्य करू शकतो. शिस्त, तत्त्व आणि संस्कार हे एकमेकांना जोडलेले धागे आहेत आणि त्यातूनच आयुष्याचे सुंदर “वस्त्र” विणले जाते हे लक्षात घ्यावे. मला खात्री आहे की, माझ्या या सर्व लेकी समाजात नक्कीच आदर्श निर्माण करतील.
धन्यवाद!

